📒 *मूतखडा म्हणजे काय?* 📒
*******************************
मूत्रपिंड, मूत्रवाहिनी व मूत्राशय यांत होणाऱ्या खड्यांनी 'मूतखडा' असे म्हणतात. मूत्रपिंडाचे कार्य हे शरीरातील पाणी व क्षार यांचा समतोल राखणे हे असते. लघवीमध्ये पाणी, क्षार, थोड्या प्रमाणात पेशी असतात. लघवीत पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास तुलनेने त्यातील क्षारांचे प्रमाण वाढते. हे क्षार मूत्रमार्गात एखाद्या ठिकाणी गोळा होतात व कालांतराने त्याचा खडा तयार होतो. मूत्रमार्गात जर काही रचनात्मक वैगुण्य असेल वा मूत्रमार्गाच्या आवरणात खडबडीतपणा निर्माण झाला असेल, तर खडे तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होते.
जर पाण्यात असलेल्या जास्तीच्या क्षारांमुळे, पाणी कमी प्यायल्याने; अळू, पालक, टोमॅटो या भाज्यांच्या सेवनामुळे; तसेच मूत्रमार्गात जंतुसंसर्ग झाल्यास कालांतराने मूतखडे तयार होतात. मात्र प्रत्येकवेळी कारण सांगता येईलच असे नाही. मूतखड्यामुळे पोटात खूप वेदना होणे (ही वेदना जांघेत व शिश्नापर्यंत जाते), लघवीत रक्त असणे, पोटात मंद दुखत राहणे; अशी लक्षणे दिसतात.
कधी कधी तापही येतो. मूतखड्यामुळे मूत्रपिंडावर दाब आला असेल, तर मूत्रपिंड कायमचे निकामी होऊ शकते. मूतखड्याची लक्षणे ही खडा कोठे आहे यावर अवलंबून असतात. क्ष-किरण तपासणीत (साधा क्ष-किरण फोटो वा शिरेतून विशिष्ट रंग शरीरात टोचून काढलेले मूत्रपिंडाचे फोटो ) मूतखड्याचे निदान होऊ शकते. खड्याचा प्रकार व जागा यावरून भरपूर पाणी पिऊन तो पाडायचा प्रयत्न करणे. शस्त्रक्रिया करून काढून टाकणे, ध्वनिलहरींचा वापर करून खडा फोडून मूत्रमार्गे त्याचे कण बाहेर टाकणे, आदी उपाय करता येतात.
मूतखडा होण्याची प्रवृत्ती असलेल्या लोकांनी भरपूर पाणी प्यावे. विशेषत: उन्हाळ्यात व प्रवासात जास्त काळजी प्यावी. जड पाणी (बोअरचे पाणी/ जास्त कॅल्शियम असलेले पाणी) पिऊ नये आळूसारख्या भाज्या कमी खाव्यात. दिवसाला निदान ४ ते ५ लिटर पाणी पिणे, हा सगळ्यात सोपा प्रतिबंधक उपाय आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा