📒 *काविळीमध्ये डोळे, लघवी पिवळी का दिसते?* 📒

***********************************


डोळे पिवळे झाले, लघवी पिवळी होऊ लागली, त्वचेला पिवळट रंग आला म्हणजे कावीळ झाली; हे सर्वांनाच माहीत आहे. कावीळ हा एक रोग असून तो विषाणू, जिवाणूंच्या संसर्गामुळे वा काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे तसेच पित्ताशयाच्या वा पित्तनलिकेच्या काही रोगांमुळेही होऊ शकतो. अर्थात सर्वसामान्यपणे दूषित पाण्यातील विषाणूंच्या संसर्गामुळे बऱ्याच जणांना हा रोग होतो.


रक्तात लाल पेशी असतात. या पेशी १२० दिवसांपर्यंत जगतात. नंतर अस्थिमज्जा, यकृत प्लीहा व लिंफ ग्रंथीत जुन्या पेशींचा नाश केला जातो. यात लाल पेशीतील हिमोग्लाबीनचे रूपांतर हिम व ग्लोबीनमध्ये केले जाते. हिमचे रूपांतर बिलीरूबीन या द्रव्यात केले जाते. याचा रंग पिवळा असतो. डोळ्यांच्या पांढऱ्या भागाबाबत या पदार्थाला विशेष आकर्षण असल्याने प्रथमत: तेथे तो जमा होतो व डोळे पिवळे दिसतात. सामान्यपणे बरेचसे बिलीरूबीन पचनसंस्थेतून परत शोषुन घेतले जाते. यकृत खराब झाले तर मात्र रक्तातील बिलीरूबीनच्या प्रमाणात वाढ होते व हे पाण्यात विद्राव्य असलेले बिलीरूबीन लघवीतून उत्सर्जित केले जाते. साहजिकच लघवीचा रंग पिवळा दिसतो. यकृतावर परिणाम झाला, तरच लघवी पिवळी दिसते. लाल रक्तपेशींचा नायनाट होण्याचे प्रमाण काही कारणांमुळे वाढले, तर रक्तातील बिलीरूबीनचे प्रमाण वाढते; पण हे बिलीरूबीन पाण्यात विद्राव्य नसल्याने लघवीवाटे बाहेर टाकले जात नाही. आपण आधीच बघितले की, कावीळ अनेक कारणांनी होत असली तरी विषाणूंमुळे होणारी कावीळ सर्वात जास्त प्रमाणात आढळते. यात यकृताची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे रक्तातील जलविद्राव्य बिलीरूबीनचे प्रमाण वाढते. म्हणूनच काविळीत डोळे पिवळे दिसतात व लघवी पिवळी होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

26 January 2023